चंद्रपूर:- भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिम जमातींच्या विकासाकरिता पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अर्थात पी.एम. जनमन योजनेची गतवर्षी सुरूवात करण्यात आली होती. आता या योजनेचा दुसरा टप्पा दिनांक 25 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत असून जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील अभियानाची सुरूवात जीवती, राजुरा आणि कोरपणा या आदिम बहुल तालुक्यांतून विविध सेवांचे आयोजनाने करण्यात येणार आहे. यात आदिम कोलाम लाभार्थ्यांना जातीचे दाखले, आधारकार्ड, किसान क्रेडीट कार्ड व रेशनकार्डही उपलब्ध करून देण्यात येईल.
प्रथम चरणात वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना दुस-या टप्प्यात आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे दाखले, जनधन खाते, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, मतदान कार्ड, किसान क्रेडीट कार्ड, रेशन कार्ड इत्यादी विविध दाखले शिबिरांचे माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आदिम जमातीतील कुटुंबांना पक्के घर, नल से जल योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे, पाडे व वस्त्यांना रस्त्याने जोडणे, प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध करून देणे, पोषण आहार आणि आरोग्य सुविधा, वस्त्या, पाडे मोबाईल आणि इंटरनेट सुविधेने जोडणे, बेरोजगारांसाठी कौशल्य विकास योजना राबविणे, उपजिविका साधनांची निर्मिती करणे, वैयक्तिक वनहक्क दावेधारकांना पीएम-किसान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
सदर अभियान जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या समन्वयाने व संबंधित सर्व शासकीय विभागांच्या सहकार्याने पार पडणार आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर द्वारे जिल्ह्यात आदिवासींसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. या योजनांचा तसेच दुस-या टप्प्यातील शिबिराला आदिम समुदायाने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.