आलापल्ली-सिरोंचा रस्त्यावर बस बंद; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान gadchiroli alapalli bus

Bhairav Diwase
आलापल्ली:- मागील 17 जुलैपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा दमदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वळण मार्ग वाहून गेले आहेत.त्यामुळे एसटी महामंडळाने या रस्त्यावर बस बंद केल्याने याचा फटका थेट शालेय विद्यार्थ्यांना बसताना दिसून येत आहे.

आलापल्ली ते सिरोंचा (353-सी) या राष्ट्रीय महामार्गाचे काम केले जात आहे. शिवाय या 100 किलोमीटर मार्गावर पुलाचे बांधकाम देखील सुरू असल्याने संबंधित कंत्राटदाराकडून रहदारी सुरू ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वळण मार्ग तयार करण्यात आले होते. मात्र नुकतेच सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर नाल्यावरील पर्यायी वळण मार्ग वाहून गेले आहेत. त्यामुळे वारंवार नाल्यांना पूर आल्याने रहदारी ठप्प झाल्याचे देखील दिसून आले. एवढेच नव्हे तर या रस्त्यावर जागोजागी चिखलाचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे खाजगी वाहनधारकांसोबतच एसटी महामंडळाच्या बसेस देखील काही दिवस बंद करण्यात आले.

आलापल्ली ते जिमलगट्टा पर्यंतचे विविध गावातील शेकडो विद्यार्थी आलापल्ली आणि अहेरी मुख्यालयात एसटी महामंडळाच्या बस मध्ये ये-जा करून शिक्षण घेतात.मात्र,सध्या स्थितीत या मार्गावर मागील 15 ते 20 दिवसापासून एसटी महामंडळाची बस पूर्णपणे या बंद असल्याने या महामार्गावरील विविध गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहेत. दुर्गम भागातील अनेक गावातून शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी वाढल्याने पालक देखील नाराजी व्यक्त करत आहेत.
आलापल्ली लगत असलेल्या मलमपल्लीचे काही विध्यार्थी पायी चालत येऊन शिक्षण घेत आहेत. मात्र, समोरील पुसूकपल्ली, मोसम, नंदिगाव, गुड्डीगुडम, निमलगुडम, गोलाकर्जी, ताटीगुडम,छल्लेवाडा, कमलापूर,रेपनपल्ली आदी गावातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नुकतेच अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी या महामार्गावरील कामावर भेट देऊन तात्काळ पर्यायी वळण मार्ग दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने अजूनही रहदारी व्यवस्थित सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे दिसून येत आहे.

जेव्हापासून पाऊस सुरू झाला तेव्हापासून या मार्गावर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर बस धावूच शकत नाही. त्यामुळे वाहन चालक देखील त्रासून गेले.सर्वे करण्यासाठी डिव्हिजन ऑफिस ला पत्र पाठविले आहे.6 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता एक बस सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, परत आज पावसाने हजेरी लावल्याने अडचणी वाढले आहेत. तरीही एक बस सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-चंद्रभूषण घागरगुंडे, आगार व्यवस्थापक अहेरी

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे या भागातील रुग्णांना, गरोदर मातांना याचा फटका बसत आहे. एवढेच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची नामुष्की ओढवली आहे. याला जबाबदार राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदार असून यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी.
-संतोष ताटीकोंडावार,सामाजिक कार्यकर्ते