मुंबई:- महाराष्ट्र पोलिस दलातील १७ हजार ४४१ रिक्त पोलिस शिपाई पदांसह विविध पदांवरील भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून, ११ हजार ९५६ पात्र ठरलेल्या उमेदवारांना सप्टेंबर अखेर मूलभूत प्रशिक्षणासाठी रवाना केले जाणार आहे. दरम्यान, इडब्ल्यूएस प्रवर्गातील तांत्रिक अडचणींमुळे पाच हजार ७८५ पदांवरील उमेदवारांच्या निवडीचा पेच कायम असून, उमेदवारांना प्रतीक्षा लागून आहे.
शासनाने पोलिसांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी ५ मार्चला जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात शिपायांची नऊ हजार ५९५ पदे, चालक पोलिस शिपायांची एक हजार ६८६ पदे, बॅण्डस्मन ४१ पदे, सशस्त्र पोलिस शिपायांची चार हजार ३४९ पदे, कारागृह शिपायांची एक हजार ८०० पदे अशी एकूण १७ हजार ४७१ रिक्त पदांची भरती सुरू करण्यात आली होती.
या जागांसाठी राज्यभरातून १६ लाख ८८ हजार ७८५ उमेदवारांचे अर्ज आले होते. १९ जून २०२४ पासून प्रत्यक्ष पोलिस भरतीसाठीच्या मैदानी चाचणीला प्रारंभ झाला. त्यानंतर कौशल्य चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. पोलिस शिपाई पदाच्या एकूण रिक्त पदांपैकी निवडपात्र सात हजार ०२३ उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली जात आहेत. मुंबई शहराची मैदानी चाचणी अद्याप सुरू आहे.
चालक पोलिस शिपाई पदांकरिता २४ जिल्हे व आयुक्तालयात भरती सुरू आहे. बॅण्डस्मन पोलिस शिपायाच्या १७ उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य राखीव पोलिस बलाच्या १९ गटांमध्ये प्रक्रिया सुरू असून, एकूण चार हजार ३४९ निवडपात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली जात आहेत. कारागृह शिपायांच्या एक हजार ८०० पदांसाठी चार घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे.