चंद्रपूर:- भद्रावती नगर परिषदेचे सलग पंधरा वर्षे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष राहिलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर यांनी जानेवारी महिन्यात काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसने उमेदवारी दिली अथवा नाही दिली तरी शंभर टक्के निवडणूक लढणारच, अशी घोषणा धानोरकर यांनी केली. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस पक्षात उमेदवारी वरुन संघर्ष अटळ असल्याचे चित्र दिसत आहे.
Also Read: Chandrapur Congress : चंद्रपूर जिल्ह्यात आयारामामुळे काँग्रेस निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता?
एकीकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे व बाजार समितीचे संचालक राजू चिकटे यांचे नाव चर्चेत असतानाच अनिल धानोरकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष रंगण्याची चिन्हे आहे.
यासंदर्भात अनिल धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, या मतदारसंघातून उमेदवारी मागणारे अनेक जण आहेत. सर्वांना उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. मात्र, धानोरकर कुटुंबाचा या मतदारसंघावर दावा आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तरी लढणार, नाही दिली तरी शंभर टक्के लढणारच. काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर इतर अनेक पक्ष आपल्याला निवडणुकीत मदत करायला तयार आहेत. मात्र, इतरांची मदत घेण्यापेक्षा काँग्रेस पक्षाला प्राधान्य आहे आणि काँग्रेस माझ्यावर अन्याय करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे बाजार समितीचे संचालक राजू चिकटे यांचे नाव देखील समोर करण्यात आले आहे. या दोन नावाशिवाय काँग्रेस पक्षात अनेक वर्षापासून सक्रिय असलेले चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व चंद्रपूर जिल्हा परिषद चे माजी सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूरच्या माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, महिला काँग्रेस अध्यक्षा नम्रता ठेमस्कर , डॉ. खापने, डॉ. आसावरी देवतळे, डॉ. विजय देवतळे, कुणबी समाजाच्या संवाद संघटनेचे सचिव विजय बदखल, डॉ. चेतन खुटेमाटे, कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांच्यासह एकूण सतरा ते अठरा उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र धानोरकर कुटुंबाचा हक्क या मतदार संघावर आहे असाही दावा अनिल धानोरकर यांनी केला आहे.
भद्रावती नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे. पाणी प्रश्न निकाली काढला आहे. मी काम करून दाखविले आहे त्यामुळेच उमेदवारी मागत आहे असेही धानोरकर म्हणाले. दरम्यान धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर आता काय भूमिका घेतात व त्यांचे मत कुणाच्या पारड्यात जाते हे विधानसभा निवडणुका जाहीर होताच कळणार आहे. सध्यातरी भद्रावती व वरोराच्या काँग्रेसच्या उमेदवारी वरून संघर्ष होणार हे स्पष्ट आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल धानोरकर हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या देखील संपर्कात आहेत. काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केली तर भाजपची दारे त्यांच्यासाठी उघडी आहेत. अशा वेळी ते वेगळा निर्णय घेऊ शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान काही दिवसापूर्वीच कुणबी समाज संघटनेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा - भद्रावती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याचा शब्द कुणालाही दिलेले नाही हे वक्तव्य केले होते. तेव्हापासूनच अनिल धानोरकर अतिशय आक्रमकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.