पोलीस पाटलासह दोन जणांवर चाकूने हल्ला
गोंडपिपरी:- गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली असताना या मिरवणुकीत नाचताना एकाला धक्का लागला. यामुळे मिरवणुकीत सहभागी पोलीस पाटील यांच्यासह दोन जणांवर चाकूने वार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सकमुर गावात घडली आहे. या घटनेमुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर संतप्त नागरिकांनी यावेळी पोलीसांची गाडी देखील फोडली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत गालबोट लावणारी घटना चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात घडली. सकमूर गावात सदरची घटना घडली असून गावचे पोलिस पाटील तुळशीराम काळे, मोहन तांगडे, विभाकर शेरके यांच्यावर सहकाऱ्यांसह चाकू हल्ला केला. यात तिघे जण जखमी झाले आहेत. प्राणघातक हल्ला झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांची गाडी अडवून धरली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करतानाच गावकऱ्यांनी पोलिसांच्या गाडीची हवा सोडली. त्यामुळे पोलिसांना गाडी घेऊन निघणे अवघड झाले.
घटनेतील चाकू हल्ला करणारा इरफान शेख हा गोंडपिंपरी तालुक्यात सकमुर या गावात अवैध दारू विक्री करतो. मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने इरफान शेखने चाकूने हल्ला केला. दरम्यान पोलिसांनी लगेच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. मात्र त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी ग्रामस्थनी केली. सकमूरवासीयांनी पोलिसांच्या गाडीजवळ गर्दी केली. यावेळी पोलिसांच्या दोन गाड्यांच्या काचाही नागरिकांनी फोडल्या. आरोपींना वाहनामध्ये घेऊन जात असताना नागरिकांनी गाडीला घेराव घातला. गर्दीतून वाहन काढताना एका नागरिकाच्या पायावरून चाक गेल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.