चंद्रपुर:- चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत आहेत. आता 7 वर्षाच्या मुलाचा बिबट्याने शिकार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, 20 सप्टेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता सिनाळा गावातील शाळेजवळ एक 7 वर्षीय मुलगा शौचालयासाठी गेला असता त्याच्यावर झुडपात लपलेल्या बिबट्याने हल्ला चढवत उचलून नेले.
घटनेची माहिती मिळताच, गावातील नागरिकांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे डीएफओ प्रशांत खाडे यांच्या नेतृत्वात स्थानिकांनी रात्रभर मुलाचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली, मात्र रात्रीच्या काळात प्रयत्न करूनही मुलाचा पत्ता लागला नाही. मात्र आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास मुलाचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये आढळून आला. लेकराला पाहून आई-बापाने हंबरडा फोडला.
दुर्गापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस पथकाने मृतदेहाचा पंचनामा करून तपासासाठी चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत.