सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे हे मागील 10 दिवसांपासुन बेपत्ता होते. रविवारी (दि.22) नंदकिशोर यांचा मृतदेह मूल जवळील उमानदीच्या पात्रात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
खोब्रागडे बेपत्ता असताना संशयित म्हणून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आता त्यांचा मृत्तदेह आढळुन आल्याने पोलिसांना त्या दिशेने तपास करून या प्रकरणाचे गुढ उकलावे लागणार आहे.
विरव्हा येथील मुळचे रहिवासी असलेले नंदकिशोर हिरामन खोब्रागडे (४६) हे मागील काही वर्षांपासुन सिंदेवाही येथे मदनापूर वार्डात राहत होते. ते सरडपार येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणुन काम करीत होते. १२ सप्टेंबर रोजी ते दुपारच्या दरम्यान दोन व्यक्तिंसोबत कामनिमित्य बाहेर गेले परंतू परत आले नाही. त्यामूळे त्यांच्या कुटुंबियांनी सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. नंदकिशोर यांचा शेतीचा वाद सिंदेवाही येथील नामदेव धनविजय यांच्यासोबत असल्याने कुटुंबियांनी धनविजय यांच्यावर संशय व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी धनविजय यांना ताब्यात घेऊन कसुन चौकशी केली असता सोपन जिल्हारे (रा. समुद्रपुर, जि. वर्धा) याचे नाव समोर आले. पोलिसांनी जिल्हारे दोघानाही ताब्यात घेतले. सध्या सिंदेवाही पोलिसांकडून आरोपी नामदेव धनविजय आणि सोपन जिल्हारे आणि एक अन्य आरोपीची चौकशी सुरु असताना रविवारी कोतवाल नंदकिशोर खोब्रागडेंचा मृत्तदेह उमा नदीच्या पात्रात सापडल्याणे खळबळ उडाली. पोलीसांनी मृत्तदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठविण्यात आले आहे. कुटुंबियांनी मात्र हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. कोतवाल खोब्रागडे याचा मृतदेह आढळून आल्याने सिंदेवाही पोलिसांना या प्रकरणाचे गूढ उकळण्याचा आव्हान पेलावे लागणार आहे.