चिमूर:- पिण्याच्या पाण्याच्या प्रमुख मागणीसह नगर परिषद क्षेत्रातील विविध मागण्यासाठी चिमूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने चिमूर नगर परिषदेवर शुक्रवारी (दि.21) घागर मोर्चा काढला. पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत असल्यामूळे महिलांनी आक्रमक होवून नगर परिषदेच्या प्रवेश द्वारावर मडके फोडून रोष व्यक्त केला. शुक्रवारी तालुका काँगेस कमिटीच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या प्रमुख मागणीसह नगर परिषद क्षेत्रातील विविध मागण्यासाठी मोर्चा काढला. सकाळी ११ वाजता तालुका काँग्रेस कार्यालयापासुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मासळ रोड ते मुख्य मार्गाने मोर्चा बालाजी मंदिराकडे गेला. बालाजी महाराजांचे दर्शन घेवून मोर्चा दुकान लाईन येथून थेट चिमूर नगरपरिषद कार्यालयावर धडकला. चिमूर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भिषण होत असताना मुख्याधिकारी लक्ष देत नसल्याने महिलांनी शेकडो मडके प्रवेश द्वारावर फोडून मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराचा निषेध केला.
मुख्याधिकारी यांना निवेदन घ्यायला बाहेर बोलविण्याची मागणी लावुन धरली. मुख्याधिकारी सुप्रिया राठोड या रजेवर असल्याचे मुळे महिला अधिकच आक्रमक झाल्या. नगर परिषदेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलीस पथकांनी मुख्य दारावर अडवून धरले. त्यामूळे काही काळ तणाव सदृश स्थिती निर्माण झाली होती. मुख्याधिकारी राठोड किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी निवेदन घ्यायला बाहेर येत नाही तो पर्यंत आम्ही नगर परिषद समोरून हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. त्यामुळे एक ते दीड तास तणावसदृश परिस्थीती होती. माजी राज्यमंत्री डॉ. अविनाश वारजूकर यांच्या आवाहनानंतर आंदोलक शांत झाले.
यावेळी निषेध सभेला खासदार नामदेव किरसान, आमदार अभिजीत वंजारी, माजी राज्यमंत्री तथा महासचिव महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे डॉ. अविनाश वारजूकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, गजानन बुटके, जेष्ठ समाजसेविका प्रज्ञाताई राजुरवाडे, चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष माधुरी रेवतकर, उपसरपंच प्रिती दिडमुठे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधीकारी यांना तातडीने हटविण्यात यावे. पिण्याचे पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा, नगरपरिषद क्षेत्रातील निवासी अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करुन पट्टे वाटप करा, १३२ के.व्हि. चे नविन पॉवर स्टेशन सुरू करा, आबादी वार्डातील देशी दारुचे नगरपरिषदेचा ना-हरकत रद्द करा, गोर गरीबांसाठी बालाजी रायपुरकर सभागृहाचे भाडे करा, जुने कंत्राट तात्काळ रद्द करुन नगरपरिषदेने चालविण्यास घावे, संत तुकाराम महाराज, संत जगनाडे महाराज सार्वजनिक सभागृह समाजाच्या नोंदणीकृत संस्थेला हस्तांतरीत करा, शिक्षण व आरोग्याच्या उत्त्तम सोयी उपलब्ध करा,१० वर्षापासुन बंद असलेली नगरपरिषद क्षेत्रातील रोजगार हमी योजना सुरु करा, ज्या घरगुती नळ कनेक्शनवर पाणी पुरवठा होत नाही. त्याची बिल माफ करा,चिमूर शहरालगत सातनाल्यावरील पुल, माणिकनगरकडे जाणारा पुल, वेलकम नगर व कवडशी रोडीकडे जाणारा पुल बांधकाम करा,उमा नदीचे खोलीकरण करुन सौदर्याकरण करा यासह विविध मागण्या करण्यात आल्या.