गडचिरोली:- जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे भामरागडमध्ये पुराचा जोर वाढला असून डॉ. आंबेडकर नगरातील २०० नागरिकांना १० सप्टेंबरच्या पहाटेपासून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, तीन राष्ट्रीय महामार्गासह अनेक छोटे नाले व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिणामी दक्षिण गडचिरोलीतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात रविवारपासून पावसाचे पुनरागमन झाले. सोमवारी दिवसभर रिपरिप सुरुच होती. रात्री पावसाचा जोर वाढला. त्यामुळे दुर्गम, अतिदुर्गम भागातील नाले, नद्या तुडूंब भरुन वाहत आहेत. पर्लकोटा नदी , कुडकेली नाला , चंद्रा नाला व पेरमिली नाला पाण्याखाली गेल्याने आलापल्ली -भामरागड, निजामाबाद -सिरोंचा -जगदलपूर , कोरची- बोटेकसा हे महामार्ग बंद झाले आहेत. यासोबतच सिरोंचा तालुक्यातील मारीगुडम पोचमार्ग, देचलीपेठ- कोपला- सोमनपल्ली तसेच राजाराम - मरनेली या मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, भामरागडमध्ये पुराचा जोर वाढल्यानंतर २०० नागरिकांना राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी सुरक्षितस्थळी हलविले. त्यांना जेवणाची पाकिटे व पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे.