हिंदुस्थानचा पदक पराक्रम #sports #ParaOlympic

Bhairav Diwase
पॅरालिम्पिकमध्ये सात सुवर्णांसह 29 पदकांची लूट
नवी दिल्ली:- हिंदुस्थानी पॅरापटूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक पराक्रम करताना नवा इतिहास रचला. त्यांनी स्पर्धेत 7 सुवर्णांसह 9 रौप्य व 13 कांस्य अशी एकूण 29 पदकांची लयलूट करीत ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदुस्थानी पथकाने टोकियो ऑलिम्पिकमधील जिंकलेल्या आपल्या 19 पदकांचा विक्रम मोडीत काढला.

25 पदकांचे लक्ष्य पार

यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत 25 पदकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत हिंदुस्थानी संघ पॅरिसच्या स्वारीवर गेला होता. अवनी लेखराच्या सुवर्णपदकाने सुरू झालेला हिंदुस्थानी पथकाचा प्रवास नवदीप सिंहच्या सुवर्णपदकाने समाप्त झाला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे 84 पॅरा ऍथलिट्सचे पथक सहभागी झाले होते. याआधी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा हिंदुस्थानसाठी सर्वात यशस्वी ठरली होती. त्यावेळी 54 खेळाडूंच्या हिंदुस्थानी पथकाने 5 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य अशी एकूण 19 पदके जिंकली होती, मात्र पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी पथकाने गतवेळपेक्षा सरस कामगिरी करून नवा इतिहास घडविला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकतक्त्यात 24 व्या स्थानी राहिलेल्या हिंदुस्थानने यावेळी 19 व्या स्थानी झेप घेतली. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील हिंदुस्थानची ही सर्वोच्च क्रमवारी होय, हे विशेष.