यवतमाळ:- दारव्हा शहरातील एका विवाहितेचा गळा दाबून सासरच्या लोकांनी खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिच्या सासरच्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) उघडकिस आली.
शबिना शहारूख चौधरी (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. या खूनाप्रकरणी तिचा पती शहारूख सलीम चौधरी, दिर इस्माईल चौधरी, फारूख चौधरी, सासरा सलीम चौधरी व सासू तारा चौधरी अशी आरोपींची नावे असून सर्वांना अटक केली.
शुक्रवारी (दि. 6) रात्री ११ वाजताच्या सुमारास शबिनाला सासरच्या मंडळींनी मृतावस्थेत दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिने गळफास घेऊन जीवन संपवल्याची त्यांनी माहिती दिली. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. परिस्थितीजन्य पुराव्यावरून संशय आल्याने बारकाईने सर्व बाबी तपासल्या. तसेच शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेचा गळा दाबल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर शबिनाचे वडील लल्लू चांद चौधरी (रा. खामगाव, जि. बुलढाणा) यांनी मुलीचा सासरच्यांनी खून केल्याची पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करीत कारवाई करण्यात आली.