चंद्रपूर:- जिल्ह्यातील जनतेने दिक्षाभूमीवर महामानवाच्या पावन स्मृतीला अभिवादन केले. मंगळवारपासून प्रांरभ झालेल्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला दुसर्या दिवशी बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी अलोट गर्दी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेल्या अस्थीकलशासह भिक्खू संघाच्या आणि समता सैनिक दलाच्या शौर्यशील पथसंचलानाने महानगरात चैतन्य आले. डॉ. दीक्षाभूमीपर्यंत भीमाच्या जयघोषाने अवघे महानगर निनादले होते. सकाळपासूनच बौद्ध अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीच्या वाटेने निघाले आणि सायंकाळपर्यंत हा परिसर निळाईने फुलला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व सामुहिक बुद्धवंदनेनंतर बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन जटपुरा गेटमार्गे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून वरोडा नाका ओलांडत दीक्षाभूमीवर पोहोचली. या मिरवणुकीत समता सैनिक दलाचे 1 हजार सैनिक सहभागी झाले होते. मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहचल्यानंतर भदन्त आर्य नागार्जुन शुरेई ससाई यांच्या हस्ते बुद्ध विहारात बाबासाहेबांचा अस्थिकलश जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. त्यानंतर समता सैनिक दलाच्या विद्यार्थ्यांनी भदन्त सुरेई ससाई यांना मानवंदना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी प्रति कटिबद्ध राहण्याची शपथ देण्यात आली. महोत्सवाच्या दुसर्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरवात सामुहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर हेमंत शेडे व संच, या चमुच्या स्फुर्तीगीतानी दीक्षाभूमीवर समस्त जनसमुह धम्ममय झाला.
यावेळी भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी, बौद्ध बांधवांना त्रिशरण व पंचशील दिले. प्रमुख अतिथी अरूण घोटेकर, श्रध्देय भदन्त नागसेन, भदन्त महानाग, भदन्त धम्मप्रकाश, भदन्त्त नागवंशा, भदन्त धम्मसारथी, भदन्त अश्वजित, भदन्त प्रज्ञाबोधी, भदन्त कुमार कश्यप, आणि वंदनीय भिक्खु संघ, मारोतराव खोबरागडे, अशोक घोटेकर, वामन मोडक आदींची उपस्थिती होती. भदन्त नागसेन म्हणाले, बौध्द धम्म एक सामाजिक सिद्धांत आहे. हा धम्म निखळ सहजसत्य आहे. मानव व निसर्गाचे संबधसूत्र आहे. म्हणूनच जगातील बहूतेक राष्ट्राने बुध्दाचे तत्वज्ञान आत्मसात केले आहे. भदन्त शीलानंद म्हणाले, मनुष्याचे जीवन सुखमय होण्यासाठी चित्ताची शुध्दी आवश्यक आहे. ससाई म्हणाले, बुद्धाच्या धम्माने विश्वाला गतिमान केले असून, शांतीच्या मार्गाने नेणारा हा धर्म आहे. संचालन डॉ. स्निग्धा सदाफळे यांनी, तर आभार डॉ. एन. एस. रामटेके यांनी मानले.