Two circles clash in immersion; विसर्जनात दोन मंडळांमध्ये हाणामारी; पोलिसांकडून लाठीमार #Chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- दुर्गादेवी विसर्जनादरम्यान नृत्य करताना टेमुर्डा येथील दोन मंडळांच्या समर्थकांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (दि. १४) उघडकीस आली. या घटनेत दहा जण जखमी झाले.

दरम्यान, पोलिसांनी लाठीमार केल्याने तणाव निवळला. अमित डाहुले (२५), गोपाल तुमराम (२६), महेश गायकवाड (२४), सौरभ झिले (२५), देवीदास टेकाम (४०), आनंद कश्यप (४२) आदींसह अन्य सहा किरकोळ, अशी जखमींची नावे आहे.

टेमुर्डा येथे सोमवारी (दि. १४) सायंकाळी ७ वाजता पाच सार्वजनिक दुर्गादेवीची ढोलताशे व डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत युवक, युवती व महिला बेधुंद नाचत होत्या. अशातच हुडकी मंडळातील एक युवक नृत्य करताना खाली कोसळला. दरम्यान, दोन मंडळांतील युवकांमध्ये कडाक्याच्या भांडण झाले. कुणीच समझोत्याची भूमिका घ्यायला तयार नव्हते. वाद वाढत जाऊन हुडकी व टेमुर्डा या दोन मंडळांच्या समर्थकांत जोरदार हाणामारी सुरू झाली. हा प्रकार पाहून काही व्यक्तींनी वरोरा पोलिसांना माहिती दिली. रात्री १ वाजता दंगा नियंत्रक पथक टेमुड्यात दाखल झाले. पोलिसांनी पुन्हा अतिरिक्त कुमक बोलावली.

 वरोराचे सहायक पोलिस निरीक्षक नासरे, बिट जमादार विकी करपे आदी दाखल झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. हाणामारीत अमित डाहुले, गोपाल तुमराम, महेश गायकवाड, सौरभ झिले, देवीदास टेकाम, आनंद कश्यप हे युवक जखमी झाले. सहा जण किरकोळ जखमी झाले. दरम्यान, रात्री उशिरा टेमुर्डा नवदुर्गा मंडळ आणि हुडकी बजरंग दलाच्या अध्यक्षांनी एकमेकांविरुद्ध वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली.