कोरपना:- गोठ्यात ठेवून असलेल्या रोटावेटर मध्ये अडकून असलेली माती काढत असताना याच रोटावेटरमध्ये अडकून एका मजुराचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (बुधवार) सकाळी कोरपणा तालुक्यातील लखमापूर या गावात घडली. रमेश शामराव टेकाम (वय 45) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यातील लखमापू-भोयेगाव या मार्गावर ट्रॅक्टर मालक-चालक रवींद्र गोपळ वडस्कर यांचा गोठा आहे. या गोठ्यात त्यांनी ट्रॅक्टर ठेवलेला होता. रोटावेटरचा हंगाम सुरू करायचा असल्यामूळे आज (बुधवार) सकाळी रोटावेटारची सफाई करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. याकरीता मजूर रमेश टेकाम याला बोलवण्यात आले.
रोटावेटर मधील अडकुन असलेली माती टेकाम नामक मजूर काढत होता. या दरम्यान चालकाने ट्रॅक्टर सुरू केला. त्यामुळे तो रोटाव्हेटर मध्ये ओढला गेला आणि त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून कारवाई सूरू असल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेत टेकाम या मजुराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.