चंद्रपूर:- चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून भाजपाकडून किशोर जोरगेवार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र ब्रिजभुषण पाझारे हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलून आ. किशोर जोरगेवार यांना पक्षाने उमेदवारी दिली. नाराज झालेले ब्रिजभुषण पाझारेंनी आज आपला अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला. ना. सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ब्रिजभुषण पाझारे यांनी भाजपा जिल्हा महामंत्री व प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
काय म्हणाले ब्रिजभुषण पाझारे?
आज मी चंद्रपूर विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी सतत 24 वर्षापासून भाजपाचे काम करत आहे. माझे लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून अनेक काम केलेले आहेत. चंद्रपूर विधानसभा निवडणूक मी लढवण्यास इच्छुक होतो. मला एबी फॉर्म सुद्धा मिळणार होता. मात्र ऐनवेळेवर तो अनेक पक्षात राहिला. आमच्या पक्षाशी गद्दारी केला. त्या किशोर जोरगेवारला चंद्रपूर विधानसभेची तिकीट मिळाली. माझं तिकीट त्यांनी हिसकलं. आता जनता किशोर जोरगेवार तुझ्या मताचा जो अधिकार आहे. आणि यावेळेस गोरगरीबांच काम करणारा ब्रिजभुषण पाझारे जो 30 वर्ष लोकांचे काम केला आहे. तो तुम्हाला दाखवून देईल या मतपेटीत काय राहणार. तुला जेवढा जोर लावायचा आहे तेवढा जोर लाव. हे जे 200 युनिट आहे ते कधी माफ करणार नाही. आणि मीच नाही तर संपूर्ण जनता हि विधानसभेची माफ करणार नाही.
ब्रिजभुषण पाझारेंनी दिला भाजपचा राजीनामा
मागील २४ वर्षापेक्षा अधिक काळापासून मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाची सेवा करत अहो त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर विधानसभेमध्ये मला उमेदवारी देण्याकरिता अनेक घडामोडी झाल्या. त्या प्रक्रियेत माझ्या उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच अपक्ष आमदार श्री किशोरजी जोरगेवार यांना उमेदवारी देण्यात आली. विधानसभेसाठी माझी संपूर्ण तयारी झालेली होती, परंतु ऐन वेळेवर श्री किशोरजी जोरगेवार यांना उमेदवारी देण्यात आली, ज्यामुळे मला मानसिक धक्का बसला आहे.
यापूर्वीही श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही एक शिष्टमंडळ म्हणून गेलो होतो आणि त्यांना विनंती केली होती की, विधानसभा उमेदवारी एका निष्ठावान कार्यकर्त्यांला देण्यात यावी. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनीही चंद्रपूर येथे बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये माझे नाव प्रमुख उमेदवार म्हणून चर्चेत आले होते. माध्यमांमधून देखील या बाबतीत चर्चा झाली होती, परंतु तरीही बाहेरील उमेदवार आयात करून माझ्या हक्काची उमेदवारी त्याला देण्यात आली. त्यामुळे मी आपणास विनंती करतो कि मला पक्षाच्या संपूर्ण जिम्मेदारी मधून कार्यमुक्त करण्यात यावे असे राजीनाम्याचे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण हरीश शर्मा व भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर राहुल पावडे यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र राजीनामा अद्यापही स्वीकारण्यात आले नसल्याची माहिती मिळालेली आहे.