Chandrapur News : शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्‍हे यांना तडीपारीची नोटीस

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेना गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिर्‍हे यांना मूल उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनी तडीपारीची नोटीस बजावली असून, त्यांच्यावर विविध गंभीर गुन्ह्यांखाली तब्बल 12 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या कारवाईनंतर गिर्‍हे यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीवर मोठे संकट घोंगावत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेले गिर्‍हे या घटनेमुळे तणावाखाली आहेत. त्यांना येत्या 9 ऑक्टोबर रोजी मूल उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात हजर राहून याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.


गिर्‍हे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये मारहाण, प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याची धमकी, अश्लील शिवीगाळ यासारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. हे सर्व गुन्हे रामनगर, चंद्रपूर, दुर्गापूर, भद्रावती, बल्लारपूर आणि पोंभुर्णा या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. विशेषतः पोंभुर्णा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी गिर्‍हे यांची तडीपारीची शिफारस केली असून, त्यांच्या प्रस्तावात सामाजिक स्वास्थ्याला धोका असल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे.


गिर्‍हे यांनी आपल्या बचावात पत्रपरिषदेत बोलताना सांगितले की, "माझ्यावर दाखल असलेल्या 12 गुन्ह्यांपैकी 8 प्रकरणांत मला सुटका मिळाली आहे. उर्वरित 4 प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत आणि या प्रकरणांत मी निर्दोष असल्याचा माझा ठाम विश्वास आहे." त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, शिवसेना फुटीनंतर शिंदे गटात न जाता उबाठातच राहणे त्यांनी पसंत केले आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली तयारी सुरु आहे.


सध्या जिल्ह्यात संदीप गिर्‍हे यांची तडीपारीच्या प्रस्तावावर कारवाई होण्याच्या शक्यतेने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. गिर्‍हे यांचे समर्थक आणि विरोधक या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)