Electric shock:शेतात विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू; एक महिला गंभीर जखमी

Bhairav Diwase
चिमूर:- चिमूर तालुक्यातील सावरगाव येथे विद्युत शॉक लागून एका महिलेचा जागीच मृत्‍यू झाला. तर दुसरी महिला गंभीर झाल्याची घटना शनिवार सकाळी सावरगाव शेत शिवारात घडली. सुंदराबाई चौधरी (वय 65) असे मृत्त महिलेचे नाव आहे. तर कमलाबाई नन्नवरे (वय 60) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी ताराबाई घुघुस्कर यांनी आपल्या शेतातील लांबा व गवत कापण्यासाठी दोन महिलांना मजुरीने बोलविले होते. त्यांनी शेतात वन्य प्राण्यांच्या उपद्रवापासून पिकांच्या रक्षणासाठी ताराचे कंपाऊंड केले होते. रात्रीच्या वेळी त्यावर विद्युत प्रवाह चालू ठेवला होता. शनिवार सकाळी विद्युत प्रवाह बंद करण्यास विसरल्याने विद्युत प्रवाह सुरूच राहिला. दोन महिला मजुरांनी शेतात प्रवेश करताच त्यांना जोरदार विद्युत शॉक बसला. यामध्ये सुंदराबाई चौधरी या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर कमलाबाई नन्नवरे ह्या गंभीर जखमी झाल्‍या असून त्यांना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सावरगाव येथील शेती श्रीहरी अत्राम यांची असून ती शेती ताराबाई घुघुसकार ह्य भाड्याने करतात अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देताच पोलिस निरीक्षक बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय चौधरी, फुलेकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जावून मृतदेहाचा पंचनामा करून प्रेत उत्तरणीय तपासणी करीता चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी शेती मालक ताराबाई घुगुस्कर यांना अटक करण्यात आली आहे.