Gadchiroli News: निवडणुकीच्या काळात विध्वंस घडवण्याचा कट; पोलिसांच्या चकमकीत गडचिरोलीत 5 माओवादी ठार

Bhairav Diwase
गडचिरोली:- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्रामध्ये विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मागील तीन ते चार दिवसांपासून काही माओवादी एकत्र येऊन कट रचन्याच्या तयारीत असून ते गडचिरोली, महाराष्ट्र व नारायणपूर, छत्तीसगड सिमेलगत असलेल्या मौजा कोपर्शी तालुका भामरागड जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तळ ठोकुन बसलेले असल्याच्या गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरुन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19/10/2024 रोजी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांचे नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या 21 तुकळ्या व सिआरपीएफ क्युएटीच्या 02 तुकल्या तातडीने कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आल्या.

सदर माओवादविरोधी अभियान राबवित असतांना काल दिनांक 21/10/2024 रोजी सकाळी 07:00 वा. च्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 02 पुरुष व 03 महिला असे एकुण 05 माओवादी मृत अवस्थेत आढळले असुन सदर मृतक माओवाद्यांची ओळख पटली असून ती खालीलप्रमाणे आहे.
1.) जया ऊर्फ भुरी पदा, वय 31 वर्षे,
रा. उलीया, तह. पाखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) कंपनी नं. 10 डिव्हीसीएम 16 लाख रु.
चकमक – 31
जाळपोळ – 03
खून – 04
इतर – 11
एकुण – 49

2.) सावजी ऊर्फ अंकलु दसरु तुलावी, वय 65 वर्षे, रा. गुरेकसा, तह. धानोरा, जि. गडचिरोली सप्लाय टिम डिव्हीसीएम 16 लाख
रु. चकमक – 84
जाळपोळ – 38
खून – 54
इतर – 50
एकुण - 226

3.) देवे ऊर्फ रिता, वय 25 वर्षे, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) सप्लाय टिम दलम सदस्य 02 लाख रु. माहिती प्रतिक्षेत

4.) बसंत, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) सप्लाय टिम दलम सदस्य 02 लाख रु. चकमक – 05
जाळपोळ – 01
इतर – 04
एकुण - 10

5.) सुखमती, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) कंपनी क्र. 10, मृतक डिकेएसझेडसीएम रुपेश मडावी याची अंगरक्षक दलम सदस्य 02 लाख रु. माहिती प्रतिक्षेत
एकुण बक्षिस 38 लाख रु.

वरील मृतक माओवाद्यांवर चकमक, जाळपोळ व खुन इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सदर घटनास्थळावरुन 05 अग्निशस्त्र हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस जवान पोअं/400 कुमोद प्रभाकर आत्राम हे जखमी झाले आहेत. अभियानादरम्यान त्यांना हेलीकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारकामी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे.

  सदरचे माओवाद विरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) श्री. सुनिल रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-60 आणि सिआरपीएफ क्युएटीच्या कमांडोंनी यशस्वीपणे पार पाडले. सन 2021 पासून गेल्या तीन वर्षात गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 85 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान, 109 माओवाद्यांना अटक करण्यात आले आहे व 37 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सलग 72 तास चाललेल्या या खडतर अभियानादरम्यान सी – 60 व क्युएटी जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. तसेच पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पून्हा एकदा सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.