चंद्रपूर:- २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार अखेर तुतारी हाती घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांना तिकिटासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून जोरगेवार यांनी प्रस्तावाला होकार दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला तर महायुती व खास करून भाजपला विदर्भात मोठा फटका बसणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर विधानसभा मतदारसंघांमधून अपक्ष म्हणून किशोर जोरगेवार निवडून आले होते. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगले कामे केले आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी कधी शिंदे गट तर कधी भाजपला वेगवेगळ्या मुद्द्यांवर समर्थन दिले होते. खास करून जोरगेवार हे भाजपमध्ये जातील असे जोरदार चर्चा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मध्ये रंगली होती. परंतु भाजपमधून त्यांना विरोध होत असल्यामुळे भाजप मध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग खडतर आहे. शिवाय ते शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु त्यांना भाजप कडून विरोध होत असल्यामुळे आमदार किशोर जोरगेवार अखेर तुतारी हाती घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांना तिकिटासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जोरगेवार यांनी या प्रस्तावाला होकार दर्शविला आहे. चंद्रपूरची जागा महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडे गेल्यास किशोर जोरगेवार हे येथून पक्षाचे उमेदवार असतील. लवकरच किशोर जोरगेवार यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा होण्याची शक्यता आहे.