चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात काही ठिकाणी त्रिकोणी तर काही ठिकाणी थेट सामना रंगणार आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील या सर्व मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना रंगणार आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामधून भाजपात प्रवेश केलेल्या विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांचे आव्हान आहे, तर काँग्रेस बंडखोर राजू झोडे देखील रिंगणात आहेत. भाजप बंडखोर ब्रिजभूषण पाझारे यांनी अखेरीस आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने भाजपसाठी हे त्रासदायक आहे. त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेस व भाजप मध्ये झालेली बंडखोरी महायुती व महाआघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ
बल्लारपूर येथून उबाठाचे संदीप गिऱ्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पण कॉंग्रेसच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार संतोष रावत यांना डोकेदुखी राहणार आहे. त्यामुळे येथे सुधीर मुनगंटीवार, संतोष रावत व डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यात लढत होईल. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे जेष्ठ नेते असून संतोष रावत हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.
राजुरा विधानसभा मतदारसंघ
राजुरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे हे पुन्हा आपले भाग्य अजमावित आहे. त्यांच्या विरोधात शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप हे स्वतंत्र भारत पक्षाकडून लढत आहेत, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे देवराव भोंगळे हेही स्पर्धेत आहेत. सोबतच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गजानन पाटील जुमनाके यांनी रंगत आणली आहे. ते आदिवासींची मते मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतात असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
वरोरा विधानसभा मतदारसंघ
वरोरा येथे भाजपचे करण देवतळे यांच्या विरोधात रमेश राजूरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपला दिलासा दिला आहे, तर दुसरीकडे याच मतदारसंघात कॉंग्रेसचे प्रवीण काकडे यांच्या विरोधात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू वंचित बहुजन आघाडीतर्फे अनिल धानोरकर रिंगणात उभे ठाकले आहे. दिवंगत माजी मंत्री संजय देवतळे यांचे पुत्र करण देवतळे व प्रविण काकडे नवखे आहेत. येथे त्रिकोणी लढतीचे संकेत आहेत.
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ
ब्रम्हपुरीतून भाजपचे कृष्णलाल सहारे यांचे विरोधात वसंत वारजूरकर यांनी उमेदवारी अर्ज भरून बंडखोरीचे अस्त्र उपसले होते. पण शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने आता या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार विरुद्ध कृष्णालाल सहारे असा सामना रंगणार आहे.
चिमूर विधानसभा मतदारसंघ
चिमूर मध्ये मात्र बंडखोरीची झळ फारशी पोहोचली नाही. येथे भाजपचे बंटी भांगडिया यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांच्यात थेट सामना रंगणार आहे.