चंद्रपूर:- माणूस हा संवेदनशील प्राणी आहे. तो आपल्या भावनांना केव्हा वाट मोकळी करून देईल सांगता येत नाही. पण यासाठी आवश्यक असते, वेळ व संधी. अशी संधी मिळाली की माणूस व्यक्त होतो. असेच काही घडले चंद्रपूरचे पालकमंत्री व राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सोबत. औचित्य होते, जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा... या गीताचे शिव जयंतीच्या पर्वावर 19 फेब्रुवारीला 'राज्यगीत' म्हणून लोकार्पण व शुभारंभाचे. या सोहळ्यात चिमुकल्यांना वाद्य वाजवतांना बघून ना. मुनगंटीवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत, स्वतः वाद्य वाजविण्यास सुरवात केली, आणि सारा आसमंत 'जय भवानी,जय शिवाजी'च्या जयघोषाने निनादला आणि 'पालक' मंत्री झाले 'बालक' अशी चर्चा सुरू झाली.
शिवजयंतीच्या निमित्ताने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वागतासाठी जगदंब ढोल-ताशा पथक सज्ज झाले होते. जगदंब ढोल-ताशा पथक चंद्रपूरातील उत्तम असे ढोल-ताशा पथक आहे. ढोल-ताशा वाजवित असतांना ना. मुनगंटीवार यांना डफली वाजविण्याचा मोह आवरला नाही. सांस्कृतिक, वने व मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १९ फेब्रुवारी रोजी शिव जयंती साजरी करताना बाल गोपालांसोबत जगदंब ढोल-ताशा पथकात डफली वादन करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी शिवभक्तांनी आपल्या कॅमेऱ्यात ना. सुधीर मुनगंटीवार हे डफली वादन करीत असतांनाचा व्हिडिओ कैद केले.