गडचिरोली:- लोकसभा असो की विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीत कायम हस्तक्षेप करतात. जिल्ह्यातील नेत्यांना डावलून परस्पर निर्णय घेतात. इतके वर्ष प्रामाणिकपणे पक्षात कार्य करूनही आमची कोंडी होत असेल तर वेगळा मार्ग का निवडू नये, असा सवाल उपस्थित करून आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत सर्वाधिक बंडखोरी काँग्रेसमध्ये झाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. यात आरमोरी विधानसभेतून काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी बंडाचे निशाण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांच्यावर टीका केली आहे. याठिकाणी काँग्रेसने माजी आमदार गेडाम यांना डावलून रामदास मसराम यांना संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असेलेले माजी आमदार आनंदराव गेडाम, वामनराव सावसागडे, डॉ. शिलू चिमुरकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, पक्षाकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात माजी आमदार आनंदराव गेडाम यांना विचारणा केली असता त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले, वडेट्टीवार नेहमीच गडचिरोली जिल्ह्यात हस्तक्षेप करतात. जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांकडे दुर्लक्ष केल्या जाते. आम्ही देखील इतके वर्ष पक्षासाठी काम केले. पण वडेट्टीवारांकडून आमची कायम कोंडी केल्या जाते. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीत देखील हाच प्रकार झाला. सर्वच दृष्टीने मी पात्र असताना देखील एका नवख्या आणि निष्क्रिय व्यक्तीला संधी देण्यात आली. हे केवळ वडेट्टीवार यांच्या हस्तक्षेपामुळे झाले. अशी टीका करून गेडाम यांनी अपक्ष अर्ज मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले. गेडाम यांच्या बंडामुळे आरमोरीत काँग्रेसला मत विभाजनाचा फटका बसू शकतो, असे जाणकार सांगतात. त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.