Chimur-Chandrapur-PM Modi: पंतप्रधान मोदी यांची चिमुरात आज सभा

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील सर्व महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चिमूरच्या क्रांती भूमीत आगमन होत आहे. सकाळी 10 वाजता होणार्‍या त्यांच्या जाहीर सभेची जय्यत तयारी झाली असून, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार सभेला उपस्थित राहणार आहेत.

मोदी व अन्य स्टार प्रचारकांचे चिमुरात आगमन होत असून, त्यांच्या या प्रचार सभेची तयारी गेल्या पंधरवाड्यापासूनच सुरू होती. पिंपळनेरी मार्गावरील भांगडिया यांच्या नवीन वाड्याला लागून असलेल्या भव्य पटांगणात ही सभा होणार आहे. 

 भारत देशाचे कोणतेही पंतप्रधान चिमूर क्रांती भूमीत निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले नाहीत. मात्र, चिमूर विधानसभा क्षेत्रातील व चंद्रपूर-गडचिरोली या दोन्ही जिल्हयातील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी येथे येत असल्याने महायुतीच्या समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. वाहतुकीचे मार्ग बदलले गेले असून, जवळपास 2 हजार पोलिसांचा ताफा सुरक्षेसाठी सज्ज आहे.