राजुरा:- राजुरा विधानसभा मतदारसंघाकरीता देवराव भोंगळे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघून विरोधकांची कोल्हेकुई वाढत चालली आहे. त्यातून विरोधकांनी समाजमाध्यमांमध्ये त्यांच्या विरोधात तथ्यहीन पोस्ट करून त्यांची बदनामी करण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला आहे. भोंगळे यांनी या आरोपांना “राजकीय षडयंत्र” म्हणून संबोधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही विरोधक त्यांच्या यशाची भीती बाळगून त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करत आहेत. “माझ्या प्रामाणिक कार्यामुळे काहींचा जळफळाट होत आहे. हे आरोप म्हणजे माझ्या राजकीय यशात अडथळा आणण्याचे प्रयत्न आहेत. जर कोणाकडे खरेच पुरावे असतील, तर ते लोकांसमोर आणावेत,” असे भोंगळे यांनी ठणकावून सांगितले.
विरोधकांच्या आरोपांना कठोर शब्दात खंडित करत भोंगळे म्हणाले, “आपल्या आरोपांना कोणताही आधार नाही, हे खुद्द विरोधकांनाही ठाऊक आहे. परंतु, केवळ माझी लोकप्रियता कमी करण्यासाठी, माझ्यावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा हा कट रचला जात आहे.”
अलीकडेच नामांकन अर्ज दाखल करतांना देवराव भोंगळे यांनी राजुरा शहरातून ऐतिहासिक अशी नामांकन रॅली काढली. हजारोंच्या संख्येने निघालेली ही रॅली बघून विरोधकांचे डोळे पिवळे झाले हे सत्य, त्यामुळे विरोधक भोंगळेंना घेरण्याचा एकही प्रयत्न सोडत नाहीत. परंतू विरोधांचे हे सर्व प्रकार धादांत खोटे असून मागील लोकसभा निवडणुकीपासुनच विरोधकांना जडलेला फेक नरेटिव्हचा आजार अजुनही बरा झाला नाही असे वाटते. त्यामुळेच राजुरा विधानसभा मतदारसंघातील सुजाण जनताच या संभ्रमात टाकणाऱ्यांना योग्य उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजुरा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी आपल्या विरोधकांनी केलेल्या निराधार आरोपांवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे विरोधकांना आव्हान केले आहे की, “खबरकट्टा संपादक गोमती पाचभाई, सुरज ठाकरे आणि भूषण फुसे यांनी माझ्यावर लावलेले आरोप निराधार आहेत. जर हे आरोप सत्य असल्याचे सिद्ध झाले, तर मी राजकारणातून संन्यास घेऊन उमेदवारी मागे घेईन.”
तसेच, भोंगळे यांनी आरोपकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपकर्त्यांवर मानहानीचा दावा करण्याचे ठरवले आहे. “हे सर्व आरोप म्हणजे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून केलेली खोटी चिखलफेक आहे. माझ्या प्रतिमेला हानी पोहोचवून मतदारांची दिशाभूल करायची आणि निवडणुकीत आपली बाजू भक्कम करायची, हा यामागचा खरा हेतू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.