Brijbhushan pazare: "उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार," ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा

Bhairav Diwase

चंद्रपूर:- ‌अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांनी बंडखोरी केली आहे. एका 'यूट्यूब चॅनल'ला दिलेल्या मुलाखतीत पाझारे भावूक झाले आणि त्यांनी आता माघार नाहीच, अशी भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्येसारखे पाऊल उचलणार, असा इशाराही त्यांनी दिला.


पाझारे यांचे हे पाऊल चंद्रपूरचे भाजप उमेदवार किशोर जोरगेवार यांच्यासाठी मोठे आव्हान मानले जात आहे. जोरगेवार यांच्यासाठी हा नवा राजकीय गतिरोधक ठरू शकतो. दरम्यान, राजुरा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवर देवराव भोंगळे यांनी, पाझारे उमेदवारी मागे घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, पाझारे यांची सध्याची आक्रमक भूमिका पाहता ते उमेदवारी मागे घेण्याची शक्यता धूसर झाल्याचे दिसते आहे. तथापि, पाझारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा खूप आदर करतात आणि मुनगंटीवारांनी त्यांना पटवून दिल्यास कदाचित ते आपली भूमिका बदलतील, असेही बोलले जाते. आता ३ नोव्हेंबरपर्यंत पाझारे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.