मुल:- बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसमध्ये खिंडार पडल्यानंतर आता त्याची धग मुल तालुक्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. मुल येथील राजगडच्या सरपंचांसह इतर सदस्य व विविध समाज बांधवांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामावर होऊन आपण भाजपमध्ये आल्याची भावना संबंधितांनी व्यक्त केली आहे. या सर्वांनी आज (शनिवार) ना. श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला लागलेली गळती काही थांबत नाहीये. गेल्या आठवड्यात बल्लारपूर येथील शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षाने काँग्रेसच्या जाचाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर येथील काटोली गावातील सरपंचांसह अख्ख्या ग्रामपंचायतने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेला चार दिवसही व्हायचे आहेत तोच आता मुल तालुक्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
मुल तालुक्यातील राजगड गावाचे सरपंच काँग्रेसचे नेते रविंद्र मनोहर चौधरी यांनी अन्य सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भोई समाजाचे ऋषी पेठकर, अमोल ठाकूर, माळी समाजाचे संकेत गायधने, माना समाजाचे प्रभाकर चौधरी यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ‘सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकसात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसमधून भाजप मध्ये दाखल झालेले सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.