चंद्रपूर:- जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजप महायुतीचे उमेदवार व वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सलग सातव्यांदा विधानसभेत प्रवेश केला आहे. हा विक्रम करणारे ते राज्यातील एकमेव उमेदवार ठरले आहेत. २५,९८५ मतांच्या फरकाने मिळवलेला हा विजय मुनगंटीवार यांच्या राजकीय ताकदीची साक्ष देतो. या विजयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुल येथे विजयानंतर महायुतीच्या वतीने विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅलीच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या एकजुटीने हा विजय शक्य झाल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूर शहरातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळणे, आणि विजयाच्या घोषणा यांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांनी औक्षण करत विजयाचा आनंद साजरा केला. या वेळी मुनगंटीवार भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले होते, आणि त्यांनी आपल्या पत्नीला मिठी मारून आभार व्यक्त केले. हा भावनिक क्षण उपस्थित कार्यकर्त्यांच्या नजरेत भरला.
सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार, मुलगी डॉ. शलाका मुनगंटीवार-बिडवई आणि जावई डॉ. तन्मय बिडवई यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांनी मुनगंटीवार यांच्या कामगिरीची माहिती दिली. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे प्रचाराला अधिक गती मिळाली, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. निवडणुकीच्या काळात घराघरात जाऊन त्यांनी जनतेपर्यंत महायुतीचे धोरण पोहोचवले. या विजयाने जनतेच्या विश्वासाचे प्रतिक म्हणून भाजप महायुतीचे यश अधोरेखित केले आहे.
विजयानंतर कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या सातव्या विजयाने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपसाठी आणखी मजबूत पाया तयार झाला आहे.