Allu Arjun Bail: अल्लू अर्जुनला मोठा दिलासा! अखेर तेलंगणा उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Bhairav Diwase

हैदराबाद:- हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी काल सकाळीच अभिनेत्याला अटक केली होती. यानंतर त्याला चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले. 

उच्च न्यायालयाचा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरीप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला मोठा दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

4 डिसेंबर रोजी, ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा 2 च्या प्रदर्शनादरम्यान, हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एक महिला ठार झाली आणि चार लोक जखमी झाले. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटक केली. एकीकडे पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली. दुसरीकडे तातडीने सुनावणीची मागणी करत हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला. आता या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.