Sudhir mungantiwar: मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळात स्थान नाही म्हणजे "कटप्पा" ने "बाहुबली" को क्यों मारा? सारखे सस्पेन्स...!

Bhairav Diwase

नागपूर:- महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मला आता सुरुवात झाली आहे. 33 वर्षानंतर नागपूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाकडे. 30 वर्ष सलग आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मंत्री पदाला पोरका झाल्याचा संताप जिल्हावासियांकडून व्यक्त होत आहे.

नुकतीच देवाभाऊ टिम च्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, त्यात सात वेळा निवडुन आलेले आणि राज्यात महत्वाची पदे भुषवित त्यांना उंचावणारे बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नाही, हा चंद्रपूर जिल्ह्यावर फार मोठा अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया आता चंद्रपूरवासियांकडून व्यक्त होवू लागल्या आहे. ही बाब म्हणजे जिल्ह्याचा विकास खुंटवणारी आहे, जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा आता बाहेरून आयात करावा लागणार ही गोष्ट चंद्रपूर वासियांना मात्र 'हजम' करण्यासारखी नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद, राज्याचे वने, वित्त-नियोजन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री पदे यासारखी राज्याची मोठी पदे त्यांनी भुषविली व त्याला न्याय दिला. संधीचे सोने करण्यात 'सुधीरभाऊ' नेहमी यशस्वी राहिले.

महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा आवर्जून समावेश असेल, असे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेलाही वाटत होते. त्यामुळे सलग सात टर्म विधानसभा जिंकणारे सुधीर मुनगंटीवार यांना काय मिळणार? याची उत्सुकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होती. मात्र सुधीर मुनगंटीवार यांचे नाव मंत्री पदाच्या यादीत न आल्यामुळे बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला. चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत, हे विशेष.

मुनगंटीवार यांनी अर्थ मंत्रालयातील केलेल्या कार्यामुळे त्यावेळचे केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एक्सलंस मिनीस्टर हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता, ही महाराष्ट्रासाठी गौरवशाली बाब आहे. अनेक संस्था, संघटनानी त्यांना पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. त्याचप्रमाणे राज्याचे वन मंत्रालय हे कमी लेखले जाणारे खाते ही मुनगंटीवार यांचेकडे आल्यानंतर त्यांनी राज्याच्या वनमंत्रालयाला साता समुद्रापार त्याची ख्याती केली तीच स्थिती सांस्कृतिक मंत्रालयाची आहे. 'गर्जा महाराष्ट्र माझा' याला राज्यगीताचा दर्जा ही मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री असतांना देण्यात आला. या बाबी मंत्री मंडळाचा विस्तार करतांना कश्या काय विसरल्या गेल्या, ही संशोधनाची बाब आहे.

अभ्यासु, दुरदृष्टी, जे बोलतो ते करतो अशी त्यांची ख्याती व स्वभाव आहे. मग त्यांना मंत्रीमंडळातुन देण्यात आलेला 'डच्चु' आकस भावनेतुन की अन्य कट कारस्थानाचा भाग आहे? याची चर्चा आता चंद्रपूर जिल्ह्यासोबतचं प्रादेशिक मिडीयामध्ये मोठ्या स्तरावर चर्चिल्या जात आहे.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळात मुनगंटीवार यांना डावलण्यात येईल याची कुजबुज चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या दुसऱ्या गोटात सुरू होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळ विस्तारानंतर घेतलेल्या पत्र परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना ज्यांना डावलण्यात आले त्यांचे 'परफार्मेन्स' निराशाजनक असेल किंवा वरिष्ठ स्तरावर पक्ष त्यांना दुसरी जबाबदारी देणार त्यामुळे ते वगळण्यात आल्याचे सुतोवाच केले.
मोठे बहुमत असलेला भाजप आज राज्यात सत्तास्थानी आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ६ पैकी ५ जागांवर भाजपचे आमदार निवडुन आले आहेत आणि जिल्ह्यात एक सुद्धा मंत्री पद देण्याचे औचित्य न बाळगणे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला बाधा निर्माण करणारी ठरू शकते, चंद्रपुर जिल्ह्यांवर अन्याय करणारी आहे, अशी प्रतिक्रिया आता मतदारांमध्ये व्यक्त होवू लागली आहे. मुनगंटीवार यांच्या रूपाने फडणवीस सरकारमध्ये एकतरी मंत्री पद मिळेल, अशी आशा जिल्हावासियांना होती, परंतु ऐन वेळी ती पण धुळीस मिळविली.

 केंद्रामधुन मुनगंटीवार यांच्या नावाला नापसंती होती की राज्यामधून की जिल्हामधून कटकारस्थान शिजले गेले हे कळायला मार्ग नाही. अखेर.... ‘कटप्पा' ने 'बाहुबली' को क्यों मारा? या बाहुबली चित्रपटातील सस्पेन्ससारखे आहे. यात कटप्पा कोण? बाहुबली कोण? याची ही चर्चा आता मतदारांमध्ये होवू लागली आहे.