Call problem: चंद्रपूरकरांचे फोन लागेना, ऑनलाईन पेमेंट देखील होईना.

Bhairav Diwase

चंद्रपूर:- आजच्या आधुनिक जगात सर्व गोष्टी मोबाईल फोनशी इतक्या जुळलेल्या आहेत की, मोबाईल फोनशिवाय एकही काम पूर्ण होत नाही. कुणाशी फोनच्या माध्यमातून संपर्क न होणे ही हतबल करणारी स्थिती असते. असाच काहीसा अनुभव रविवारी सायंकाळी चंद्रपूरकरांना आला.

चंद्रपूरकरांना फोन करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रारी शहराच्या विविध भागातून येत होत्या. विशेषत: जिओ दूरसंचार कंपनीचे ग्राहक असलेल्याना या त्रासाचा अधिक सामना करावा लागला. याशिवाय मोबाईल फोनच्या माध्यमातून युपीआय पेमेंट करताना देखील अनेक अडचणी येत असल्याचे दिसून आले.

फोन कसा लावायचा?

चंद्रपूरकरांसाठी रविवारची सायंकाळ त्रासदायक ठरली . दुपारी चारनंतर मोठ्या प्रमाणात कॉल ड्रॉपच्या तक्रारी सर्वत्र नागरिकांकडून केल्या जात होत्या. फोन लावल्यावर बीप या ध्वनीसह फोन बंद होत आहेत. शहरात प्रामुख्याने व्होडाफोन-आयडिया, एअरटेल, जिओ या दूरसंचार कंपनीचे ग्राहक आहेत. मोबाईल नेटवर्कमध्ये समस्या येत असल्याने चंद्रपूरकरांना एकमेकांना फोन लावण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला ही समस्या व्यक्तिगत असल्याचे समजून अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र फार वेळपर्यंत अशीच समस्या होत असल्याने नागरिकांनी तक्रार करायला सुरुवात केली. जिओच्या वापरकर्त्यांकडून अशाप्रकारची तक्रार जास्त प्रमाणात झाली असल्याची माहिती आहे.