Crime News : संपत्तीच्या वादातून नातवानेच आजोबाचा काढला काटा

Bhairav Diwase

नंदुरबार:- नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नंदूरबारजवळच्या शहादा शहरातील शिरूड रस्त्यावर असलेल्या तापी रेसीडन्सीजवळ कौटुंबिक वादातून 60 वर्षीय आजोबाचा अल्पवयीन नातवानेच खून केला आहे.

संपत्तीच्या वादातून नातवाने आजोबाचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 

दशरथ राजे (60) असे मृत व्यक्तीचे नाव असून रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते जेवणानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी त्यांचा अल्पवयीन नातू आणि त्याचा एक साथीदार हे बाईकवरून त्यांच्याजवळ आले आणि त्या नातवाने दशरथ राजे यांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यानंतर तो अल्पवयीन मुलगा आणि त्याचा साथीदार दोघेही फरार झाले. 

घटनेची माहिती मिळताच दशरथ राजे यांचा मुलगा राहुल राजे घटनास्थळी दाखल झाला. त्यांना उपचारासाठी खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल करत असतानाचा प्रवासात त्यांचा मृत्यू झाला. 

अल्पवयीन नातवासह एकाला बेड्या

या प्रकरणी अल्पवयीन नातवासह एक अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह राजपूत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे करीत आहेत.