परभणी:- परभणीच्या सेलुतील जलसंपदा विभाग कार्यालयात लोअर दुधना पाटबंधारे उपविभाग क्रमांक दोनला काल संध्याकाळी अचानक आग लागली.
या आगीत कार्यालयातील टेबल, खुर्च्यासह इतर साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याची घटना कळताच आग विझवण्यासाठी सेलू पालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.
मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे या कार्यालयातील टेबल खुर्ची सह काही महत्त्वाचे कागदपत्रे ही जळून खाक झाले.
शासकीय कार्यालयाला आग लागण्याची घटना घडली असताना सुद्धा या ठिकाणी अद्यापपर्यंत कुठल्याही शासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. दरम्यान आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केलाय.
पोलिसांचा तपास झाल्यानंतरच किती नुकसान झाले आहे आणि आग कशी लागली हे स्पष्ट होईल. दरम्यान, या आगीमुळे कार्यालयातील आतील भाग जळून खाक झालाय. शासकीय ऐवजही मोठ्या प्रमाणात जळालाय.