पोंभूर्णा:- पोंभूर्ण्यापासून ५ किमी. अंतरावर असलेल्या सेल्लुर नागरेड्डी येथील प्रकाश मारोती कोतपेल्लीवार या शेतकऱ्याच्या शेतातील धानाच्या पुंजण्याला रविवारी दि. १ डिसेंबर दुपारी आग लागल्याने पुंजणे जळून खाक झाले.
प्रकाश कोतपेल्लीवार यांची गावालगतच ३ एकर धानाची शेती आहे. रविवारी दुपारी अचानक पुंजण्याला आग लागली. माहिती मिळताच पोंभूर्णा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाची गाडी बोलाविण्यात आली. अग्निशमनची गाडी येईपर्यंत अर्धेअधिक पुंजणा जळला होता. अग्निशमन गाडी तर घटनास्थळावर पोहचली परंतू गाडीतील पाणी मारणारे संयंत्र नादुरुस्त असल्याने अग्निशमनच्या गाडीचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. शेतकऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याचाही काही उपयोग होऊ शकला नाही. शेवटी पुंजणा जळून खाक झाला. जवळपास ६० पोते धानाची नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन काढणीच्या वेळेस ६० पोते धानाची नुकसान झाल्याने शेतकरी व त्याचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहे.
शेतकरी व कुटुंबीय पुंजण्याची आग विझविण्याच्या प्रयत्नात होते. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास महसुल विभागाचे तलाठी व पोंभूर्णा पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. महसूल विभाग घटनास्थळावर येऊन पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करेलही, नेहमीप्रमाणे तोकडी मदत मिळेल तेंव्हा मिळेल, पन आज शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावल्या गेला आहे. शेतकऱ्याला शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.