छत्रपती संभाजीनगर:- बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये जवान बनवण्याचे आमिष दाखवून चक्क बोगस भरती केल्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलंय. या भरतीसाठी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयाच्या जवळच असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पोलिस भरतीप्रमाणे मैदानी चाचणीदेखील घेण्यात आली.
मात्र, पात्र उमेदवारांना नियुक्ती शुल्क मागताच टोळीचा भांडाफोड झाला. विशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव अशी तिघा भरती प्रक्रिया राबविणाऱ्या भामट्याची नावे आहेत. हे तिघेही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील रहिवाशी आहेत. या प्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. विशाल देवळी, विलास माने आणि सनी बागव या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर महाराष्ट्र कमांडो फोर्स भरतीची बनावट जाहिरात देऊन सुमारे ९३ तरुणांकडून प्रत्येकी ६ हजार रुपयेप्रमाणे तब्बल ५ लाख ५८ हजार रुपये उकळल्याच तपासात समोर आले. ऑफलाइन भरती प्रक्रिया असल्याचे सांगून लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिघांनी बेरोजगार उमेदवारांची भरती प्रक्रियादेखील राबवली. पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावस असलेल्या मराठवाडा सांस्कृतीक क्रीडा मंडळाच्या मैदानावर आरोपींनी भरतीची प्रक्रिया राबविली. भरतीसाठी त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नव्हती. आर्मीचा ड्रेस परिधान करून एवढ्या प्रमाणात बोगस भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.