Nagpur: आता नागपूरात मंत्रिमंडळ विस्तार, रविवारी होणार शपथविधी सोहळा

Bhairav Diwase

नागपूर:- महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला वेग आला असून मुंबईऐवजी आता नागपूरात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. या विस्तारात भाजपचे २१, राष्ट्रवादीचे १० तर शिवसेनेच्या १२ मंत्र्याचा शपथविधी होईल.

नागपूरात पहिल्यांदा हा मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. १५ डिसेंबर रोजी रविवारी हा शपथविधी सोहळा दुपारी 4 वाजता होणार आहे. १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार असून त्यामुळे हे ठिकाण बदलल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीत झालेल्या बैठकीत बुधवारी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला कोण कोणती खाती मिळणार हे ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खाते वाटपाचा तिढा सुटल्यामुळे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होण्याची शक्यता आहे.

भाजपकडे नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ओबीसी कल्याण ही खाती असणार आहे.

शिवसेने शिंदे गटाच्या वाटयाला महसूल, सार्वजनिक बांधकाम खात्यासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाणार आहे.