चंद्रपूर (सौरभ चौधरी, सावली प्रतिनिधी):- "सिम व्हेरिफिकेशन" करायचं असल्याचे सांगून सायबर भामट्याने अनोळखी नंबरवरून कॉल करून फिर्यादी ठेकेदार किशोर ढिवरूजी कुनघाडकर (रा. पाथरी) यांच्या बँक खात्यातून ३ लाख २२ हजार ९३४ रुपयांची रक्कम उडविल्याची घटना येथे उघडकीस आली. यासंदर्भात पोलीस ठाणे पाथरी येथे सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
किशोर कुनघाडकर यांना (०६२०२१४५६३९) या नंबरवरून फोन आला. किशोर यांनी तो कॉल उचलताच "मी जिओ केअर सेंटर मुंबई येथून बोलत असून तुमची सिम व्हेरिफाय होणार आहे. यासाठी तुमचे सिम बंद करण्यात येईल. त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी कंपनीद्वारे तुम्हाला कॉल येईल. त्यानुसार तुम्ही १ नंबरचे बटन दाबा, त्यानंतर तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक सांगाल, अशी सूचना देण्यात आली. काही वेळाने पुन्हा फिर्यादीला (०२२३५०६२२२२) या नंबर वरून कॉल आला. सिम व्हेरिफिकेशन होण्यासाठी १ नंबरची बटन दाबा, असे सांगितले. एक नंबरची बटन दाबताच फोन कट होऊन सिम कार्ड बंद झाले आणि लगेच त्यांच्या दोन-तीन बँक खात्यातून टप्प्याटप्याने एकूण ३ लाख २२ हजार ९३४ रुपये उडविले. हा प्रकार लक्षात येताच किशोर कुनघाडकर यांनी पाथरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद रासकर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.