Murder News: निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने केला वर्ग मैत्रिणीचा खून

Bhairav Diwase

चिमूर:- चिमूर येथील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह दिनांक 10 डिसेंबरला अखेर सापडलाय. हा मृतदेह नागपूर शहराजवळील हरिश्चंद्रवेळा गावाजवळ निर्जनस्थळी आढळून आलाय.

दरम्यान, या महिलेच्या हत्येप्रकरणात पोलीसांनी नरेश डाहूले याला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अरुणा काकडे (वय 37) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, चिमूर येथील देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका अरुणा काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र अरुणा काकडे घरी न परतल्याने कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. मिसिंग तक्रार असल्याने नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आरोपीचा छडा लावला आहे. निलंबत पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याने अरुणा काकडे (वय 37) या महिलेचा खून केला असल्याचे समोर आले आहे.

मृत्यू झालेली महिला अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहूले लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते. दोघे वर्गमित्र होते. 26 तारखेला मृतक अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते. दरम्यान, या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला होता. दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणा यांचा गळा दाबून हत्या केली.