चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारल्याची माहिती पुढे आली आहे. यात तब्बल 3 कोटी 70 लाख रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारला असल्याचे पुढे आले आहे. 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक व्यवहारांमध्ये सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर रक्कम वळते केल्याचे सांगितलं जातंय.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून RTGS केलेली रक्कम नागपूर येथील येस बँकच्या माध्यमातून होते लाभार्थीच्या खात्यात जमा होते. अशातच 7 आणि 10 फेब्रुवारी या दोन दिवसात 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँक 'मेकर आणि चेकर' आहेत. तर बेनिफिशरी बँक येस बँक असल्याचे सांगितलं जातंय. मात्र आरटीजीएस (RTGS) केलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याने संशय आला. दरम्यान चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्थानकात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय. मात्र या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.