मुंबई:- महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
काँग्रेसकडून विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे आभार मानले. वडेट्टीवार म्हणाले, 'मला पुन्हा एकदा विधीमंडळ पक्षनेतेपदी काम करण्याची संधी दिली आहे. राज्यात एकीकडे बहुमत असलेला सत्ताधारी आणि अल्प संख्येत असलेले विरोधक अशी परिस्थिती आहे. पुढील पाच वर्ष जनतेसाठी राहून काम करू. लोकांचा मनात, हृदयात इतिहास प्रस्थापित करण्याचे काम करू'.
काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, 'हर्षवर्धन सपकाळ हे संघटनेतील व्यक्तिमत्व आहे. ते पूर्णवेळ संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सेवा भावी विचारांचं व्यक्तिमत्व आहे. तुळशीपत्र वाहून पूर्णवेळ काम करणार नेता म्हणून अध्यक्ष केले आहे. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्रमध्ये काम करू, पक्ष मजबूत करू'.
वडेट्टीवार यांनी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, 'सत्ता मिळाली की लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. यापेक्षा चांगले दिवस येईल. बावनकुळे यांना सांगतो की, दुसऱ्यांना कमी लेखू नये'.
'पूर्व आणि पश्चिम विदर्भ पद आहे. विदर्भ काँग्रेससाठी गड राहिलेला आहे. विदर्भातील जनता पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी ताकदीने उभी राहील, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.