वर्धा:- वर्ध्यातील सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
तर अन्य एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. हे चारही मित्र वाढदिवसाची पार्टी करायला गेले होते. परत येत असताना वर्धा नागपूर रस्त्यावरूल सेलू बायपास परिसरात त्यांच्या कारला अपघात झाला. भरधाव कार पलटी झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची दखल सेलू पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास केला जात आहे.
शुभम मेश्राम, सुशील मस्के आणि समीर सुटे अशी मृत पावलेल्या तीन मित्रांची नावं आहेत. तर धनराज धाबर्डे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील रहिवासी असलेले चारही जण गुरुवारी वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी नागपूरला गेले होते. पार्टी झाल्यानंतर रात्री उशीरा चारही जण वर्ध्याच्या दिशेनं येत होते. दरम्यान, वर्धा नागपूर रस्त्यावरून भरधाव वेगाने जात असताना सेलू बायपास रोडवर त्यांच्या कारला अपघात झाला. कार पाच ते सहा वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाची रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली.
या अपघातात धनराज धाबर्डे नावाचा तरुण देखील गंभीर जखमी झाला. त्याला सुरुवातीला सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपुरला हलवण्यात आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातावेळी चालकाने दारु प्यायली होती का? याचा तपास सेलू पोलीस करत आहेत. वाढदिवसाची पार्टी करायला गेलेल्या तीन जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.