Shivsena Join: वरोऱ्यात शिवसेनेला हादरा; ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिंदेंच्या सेनेत

Bhairav Diwase

मुंबई:- शिवसेनेच्या ठाकरे गटाला आज मोठा हादरा बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थेट शिंदे सेनेत उडी घेतली. विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढलेल्या जीवतोडेंनी आता अधिकृतरित्या बंडखोरीची मोहर उमटवत ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे.


विधानसभा निवडणुकीत जीवतोडेंनी वरोरा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत तब्बल ५० हजारांहून अधिक मतं घेतली होती. दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटात पुनरागमन केले होते, पण आता त्यांनी मुंबई गाठून थेट पक्षांतराचा धडाका लावला आहे. त्यांच्या या निर्णयाने ठाकरे गटाच्या नेत्यांना धक्का बसला असून, जिल्ह्यात प्रचंड चर्चा रंगली आहे.


जिल्ह्यात मोठी घडामोड?

जीवतोडे यांनी पक्ष बदलला असला तरी त्यांना अद्याप कोणतेही पद देण्यात आलेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार वरोरा-भद्रावती मतदारसंघात शिंदे सेनेचा मोठा मेळावा होणार असून, त्यावेळी जीवतोडेंच्या कार्यकर्त्यांचा लोंढा शिंदे सेनेत दाखल होणार आहे.

यामुळे ठाकरे गटाच्या मातोश्रीपासून जिल्ह्यापर्यंत खळबळ उडाली असून, शिंदे गटाने जिल्ह्यातील मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. जीवतोडे यांच्या या प्रवेशानंतर ठाकरे गटाचा जिल्ह्यातील गड आणखी पोखरला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.