Bribe Case : पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार लाच घेताना 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

Bhairav Diwase

यवतमाळ:- दिग्रस पाेलिस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक व हवालदार यांना मंगळवार, 11 मार्चला लाच घेताना रंगेहात पकडल्याने चांगलीच खळबळ उडाली. उपनिरीक्षक नारायण धाेंडबा लाेंढे (वय 54) व हवालदार दिलीप प्रल्हाद राठाेड (वय 41) या दाेघांवर यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली.

पाेलिस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्ह्यामध्ये मदत करून त्यावर कारवाई न करण्याकरिता 5 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजाेडीअंती 2 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले व ते स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी दिग्रस पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पाेलिस निरीक्षक मनाेज ओरके करीत आहेत.

ही कारवाई विभागाचे अमरावती परिक्षेत्र अधीक्षक मारुती जगताप, अपर अधीक्षक सचिंद्र शिंदे, यवतमाळ उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक मनाेज ओरके, निरीक्षक अर्जुन घनवट आणि अंमलदार अतुल मते, सचिन भाेयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, भागवत पाटील व अतुल नागमाेते यांनी यशस्वी केली.