मुंबई:- विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून मंगळवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारला पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये विधीमंडळासाठी 500 कोटींहून अधिक तरतूद करण्यात आलेली आहे. विधानभवन चकाचक करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. यावरूनच भाजप आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी सरकारला घेरले असून विधीमंडळाच्या रिक्त कर्मचाऱ्यांचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला.
विधीमंडळामध्ये सदस्याने एखाद्या मुद्द्यावर भाषण केल्यावर त्याची प्रतिलिपी प्रिझन हॉलमध्ये टाकण्याची पद्धत होती. आकडे चुकले असले तर ते सुधारित करून दिले जायचे. पण आपण ते पूर्णपणे बंद केले आहे. यात विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा दोष नाही. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत विधान भवनाचे कर्मचारी करतात. त्यांची संख्या कमी असल्याने ते न्याय देऊ शकत नाहीत, असे मुनगंटीवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी विधीमंडळासाठी 542 कोटींचा निधी मंजूर केला. विधान भवन चकाचक झाले पाहिजे, हे खरे आहे. कारण विदेशी लोक येतात तेव्हा विधान भवन पाहिल्यावर पहिले इंप्रेशन पडले पाहिजे. पण लग्नामध्ये जेवण करण्यासाठी पैसे आहेत, मात्र मंगळसूत्रासाठी पैसे नाही. ते पितळेचे घेतले जात असेल तर हे अडचणीचे आहे.
प्रतिलिपीसाठी कागद जास्त लागेल याची चिंता करू नका. आपण ग्रीन कव्हर वाढवला असून झाडी लावली आहेत. सदस्य जे विषय मांडतात त्याच्या प्रतिलिपी आल्याच पाहिजेत. त्या न आल्याने त्यात सुधारणा करता येत नाही. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत रिक्त पदे भरा. मंत्र्यासाठी 50-50 कर्मचारी, पण ज्या पवित्र सभागृहात जिथे जनतेचा आवाज बुलंद करायचा तिथे कर्मचारी नसेल तर आमचा आवाज अरण्य रुदन असेल तर हे काम चांगले नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.