Chandrapur News: 'त्या' पाचही तरूणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

Bhairav Diwase

चंद्रपूर:- सुटीचा दिवस असल्याने पर्यटनासाठी आलेल्या पाच तरूणांवर शनिवारी (दि.१५) नागभिड तालुक्यातील ब्रिटीशकालीन घोडाझरी तलावात काळाने झडप घातली. पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या सहा पैकी पाच तरूणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

या घटनेने अख्खा चंद्रपूर जिल्हा हळहळला. रविवारी (दि.१६) दुपारी साडेबाराच्या सुमारास पाचही मृतदेहावर चिमूर तालुक्यातील कोलारी (साठगाव) या त्यांच्या गावी एकाच वेळी वेगवेगळ्या सरणावर पार्थिवाला चित्ताग्नी देण्यात आली.

शनिवार पासून शोकसागरात बुडालेल्या कोलारी गावात आज आक्रोश, हुंदके आणि शोक पहायला मिळाला. एैन उमेदीच्या वयातच पाच तरूणांना काळाने हिरावून घेतल्याने अंत्यसंस्कारावेळी नागरिकांना आपले अश्रू थांबविता आले नाही. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे यांचेवर अत्यंसंस्कार पार पडले.