कोरपना:- कोरपाना तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासंदर्भात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन ३ मार्च २०२५ रोजी सादर केले होते.
त्या अनुषंगाने सदर निवेदनात तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासंदर्भात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी सोबत तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्याची मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने १७ मार्च २०२५रोजी सकाळी ११ वाजता तक्रार निवारण सभेचे आयोजन तहसील कार्यालय येथील सभागृहात केलेले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२४-२५ अंतर्गत तालुक्यातील अधिसूचित पिकांची पिक विमा रक्कम न मिळाल्याने सदर तक्रारी व निवेदने तालुका कृषी अधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले होते. सदरच्या तक्रारीची सुनवाई कोरपना तहसीलदार तथा अध्यक्ष तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सभेचे आयोजन केलेले आहे.
तसेच खरीप हंगाम २०२४- २५ मध्ये प्राप्त पिक नुकसान व तक्रारीच्या याद्या, पीक निहाय व शेतकरी नहाय प्राप्त पिक नुकसान,तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या, बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या,पीक विम्याचा आर्थिक लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या,या प्रकारच्या संपूर्ण याद्या पीक व शेतकरी निहाय तसेच आवश्यक त्या संपूर्ण माहितीसह न चुकता तक्रार निवारण समितीच्या सभेस उपस्थित राहण्याकरिता तालुका कृषी अधिकारी कोरपना यांच्या मार्फत जिल्हा व्यवस्थापक व तालुका प्रतिनिधी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांना कळविलेले आहे.
तरी सदर होणाऱ्या पीक विमा तक्रार निवारण सभेस कोरपना तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केलेले आहे.
कोरपना तहसील कार्यालय येथे तक्रार निवारण सभेस तालुक्यातील जास्तीत जास्त पिक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे जेणेकरून त्यांचे मत सदर सभेत इन्शुरन्स कंपनी समोर मांडून पिक विमा मिळवणे सोयीचे होईल.
आशिष ताजने