चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेल्या ५ मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पाचही मुलांचे मृतदेह तासभरानंतर नागभिड पोलिसांनी शोधून काढले. मृतदेह ताब्यात घेऊन नागभिड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आली आहेत.
त्यानंतर गावंडे कुटूंबियांच्या स्वाधीन केले जाणार आहे. आज शनिवारी (दि. 15) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे (रा. साटगाव कोलारी (ता.चिमूर)अशी मृतांची नावे आहेत. गावंडे कुटूंबियावर शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती सगळीकडे पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या परिसरातील ढिवर बांधवांच्या मदतीने मृतदेहांसाठी शोध मोहीम राबविण्यात आली. अवघ्या तासभरात खोल खड्यात एकाच ठिकाणी पाचही मुलांचे मृतदेह आढळून आले. मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतदेह ग्रामीण रूग्णालय नागगभीड येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहे.