चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आली आहे. येथील घोडाझरी तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने 5 तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात आज (दि. १५ मार्च) घडली आहे. पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवाशी आहेत.
एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे अशी मृत्यू झालेल्या तरुणाची नावे आहेत.
घोडाझरी तलाव हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे साठगाव कोलारीमधील युवकही पर्यटनासाठी आले होते. हे पाचही तरुण उन्हाळ्याचा पारा चढत असल्याने घोडाझरी तलावात दुपारच्या दरम्यान आंघोळ करण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हे पाचही तरुण पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच, तलाव पात्रात बुडालेल्या तरुणांना पाण्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.