धुळवडीच्या दिवशी दोन भावांचा दुर्दैवी अंत
यवतमाळ:- यवतमाळच्या डोंगरखर्डा या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं ऐन धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित दोन भाऊ धुळवडीसाठी पाहुणे बनून आले होते. पण एका धुळवड साजरी करण्याचा उत्साह त्यांना चांगलाच महागात पडला. दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मयत भावंडं इतर सहा जणांसोबत धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी गेले होते. पण आठ पैकी पाच जण अचानक पाण्यात बुडू लागले. इतर तीन जणांनी कसंबसं स्वत:ला वाचवलं. पण दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्याचा मृतदेह अद्याप सापडला नाही.
ही घटना यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळच असलेल्या खोरद येथील धरणावर घडली आहे.आठ जण धरणावर पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी पाच जण अचानक बुडायला लागले. त्यातील तिघांना वाचवण्यात यश आले, तर दोन मावस भावांचा यात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
परिसरात अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृतकांची नावे आहेत. ते दोघे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. शोध मोहिमेदरम्यान मृतक पंकज झाडे याचा मृतदेह सापडला असून जयंत धानफुले यांचा मृतदेह मिळालेला नाही. अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.