गडचिरोली/चंद्रपूर:- विद्यापीठाने २०२४-२५ व पुढे या शैक्षणिक वर्षासाठी बीए, बीकॉम, बीएसस्सी, एमएसस्सी, एमबीए, मास कम्युनिकेशन, बीपीएड, फॅशन डिझाईन या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात प्रचंड वाढ करून विद्यार्थ्यांची आर्थिक लुट सुरू केली आहे.
अचानक केलेल्या या शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांसमोर चिंतेचे सावट आहे. दरम्यान गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे पूर्ण करायचे असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
गोंडवाना विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे २०२४-२५ या शैक्षणिक सत्राच्या मध्यंतरी अचानक शैक्षणिक शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क भरतांना त्रास सहन करावा लागत आहे. काही अभ्यासक्रमात तर इतकी प्रचंड शुल्क वाढ आहे की विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बीए अभ्यासक्रमाचे शुल्क आता सहा हजार रूपये केले आहे. त्या पाठोपाठ बीकॉम ६१०० रूपये, बीबीए ९०००, बीएफए ६०००, एमए तथा इतर सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम १० हजार, बीकॉम संगणक १० हजार, एमकॉम १० हजार, बीएसस्सी १० हजार, बीसीसी, बीसीए आयटी या अभ्यासक्रमासाठी १० हजार, एमएससी २० हजार, मास्टर ऑफ फॅशन डिझाईन ३७ हजार ७८२, बीए एलएलबी ३७ हजार ७८२, बीएससी बायो टेक्नोलॉजी, एमएससी या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क २० हजार पर्यंत वाढविले आहे, बीपीएड २३ हजार, एमबीए २५ हजार ३०० तसेच एलएलबी या अभ्यासक्रमाचे शुल्कात देखील प्रचंड मोठी वाढ केली आहे.