मुंबई:- महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये वाढती गुन्हेगारी आणि पोलिस दलातील तुटवडा हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली असता, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10,500 रिक्त जागांसाठी लवकरच पोलीस भरती होणार असल्याची मोठी घोषणा केली.
राज्यात लोकसंख्या वाढत असताना पोलीस दलातील कर्मचारी संख्येची कमतरता जाणवत आहे. यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, राज्यात सध्या 10,500 पोलीस पदे रिक्त आहेत.
तसेच दरवर्षी 7 ते 8 हजार पोलीस सेवानिवृत्त होतात. मागील तीन वर्षांत विक्रमी 35,802 पदांची भरती करण्यात आली आहे. आता उर्वरित रिक्त जागांसाठीही लवकरच प्रक्रिया राबवली जाणार आहे. विशेषतः पोलीस उपनिरीक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यात आल्या असल्याचीही माहिती त्यांनी दिली.